'श्री जिदेश्वर साळी महात्म्य पुराण' या ग्रंथातील नोंदींनुसार, भगवान श्री जिदेश्वर यांचा जन्म एखाद्या साधारण जिवाप्रमाणे झालेला नाही, तर भगवान महादेवाने त्यांची स्वतः निर्मिती केली आहे. ज्याप्रमाणे आदिमायेने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना जन्म दिला, किंवा विष्णूच्या नाभीकमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, त्याच धर्तीवर ही निर्मिती आहे. माता पार्वतीने जसे आपल्या मळापासून श्री गणेशाला स्वरूप दिले आणि नंतर शंकरांनी त्यांना गजमुख प्रदान केले, तसेच भगवान शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांनी माता अनसूयेच्या विनंतीनुसार स्वतःच्या अंशातून श्री दत्तात्रयांना साकारले. (संदर्भ: श्री जिदेश्वर साळी महात्म्य पुराण - पाचवा अध्याय)
जसा उल्लेख आढळतो की ब्रह्मपुत्र अत्री ऋषींची निर्मिती ब्रह्मदेवापासून झाली, तसेच भगवान श्री जिदेश्वरांची निर्मिती प्रत्यक्ष भगवान शंकरांनी केली आहे. या प्रक्रियेची सविस्तर कथा 'श्री जिदेश्वर साळी महात्म्य पुराण' मध्ये वर्णिलेली असून, महर्षी व्यासांनी स्कंद पुराणात याची मांडणी केली आहे. अत्री ऋषींच्या 'मूळस्तंभ' (साळी महात्म्य पुराण) या संस्कृत ग्रंथाचा आधार घेऊन श्री. भानुदास खडामकर यांनी 'अथ साळी महात्म्य पुराण' हा ग्रंथ प्राकृत भाषेत साकारला, असा संदर्भ २३ व्या अध्यायात येतो. प्रा. नरेंद्र सिताराम मारवाडे यांच्या 'साळी समाजाचा इतिहास आणि संस्कृती - भाग १' मध्येही हेच नमूद आहे. शालिवाहन शके १८३५ (इ.स. १९५३) मध्ये हा प्राकृत ग्रंथ सिद्ध झाला. पुढे २-४-१९८० (श्रावण शुद्ध १३, शके १९०४) रोजी श्री. रामचंद्र विष्णू घारे यांनी याचे पुनर्मुद्रण केले, ज्यासाठी के. पावडे, के. बी. आर. पाडकर, के. रावबहादूर मारतराव लुंगे आणि काशिनाथराव जंगमे यांच्या योगदानाचा उल्लेख आहे. त्यानंतर प्रा. सी. आशा मुसळे यांनी हा ग्रंथ पुन्हा प्रसिद्ध केला. १९ ऑगस्ट २०२२ रोजी जिदेश्वर.कॉम टीमने 'श्री भगवान जिदेश्वर विजय' या नावाने ई-ग्रंथ उपलब्ध करून दिला. २८ डिसेंबर २०२४ रोजी श्री. सदाशिव विचकर यांनी शब्दांर्थासह 'भावार्थ श्री जिदेश्वर साळी महात्म्य पुराण' प्रसिद्ध केले. अलीकडेच ६-७-२०२५ (शके १९४७) रोजी श्री. महादेव साळी यांनी अवघा साळी माझा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ३३ संगीत भावचित्रांसह सुधारित आवृत्ती प्रकाशित केली आहे.
लेखक: श्री. सदाशिव शंकर विचकर
प्रस्तावना स्वरूप -
१. सृष्टीची निर्मिती - पुरातन आणि पौराणिक दृष्टिकोन
२. सृष्टीची निर्मिती - आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन
३. सनातन हिंदू धर्मातील कालगणना
श्री. अन्नरत्न साळी (पुणे) यांच्या सौजन्याने
स्व. अहिल्याबाई आणि स्व. सामाकांत शंकर ढगे यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित
आधार: "स्वकुळ साळी समाजाचा इतिहास"