रामदास मठापासून मंदिराची स्थापना
स्वातंत्र्यपूर्व काळापासून अंजनगाव सुर्जी येथील काठीपुरा भागात श्री रामदास नावाचे साळी समाजाचे एक तपस्वी सद्गृहस्थ राहत असत. त्यांचा तेथे एक मठ होता आणि त्यांना कोणीही कौटुंबिक नातेवाईक नव्हते. आपले संपूर्ण आयुष्य ईश्वरचरणी अर्पण करणाऱ्या या तपस्वी पुरुषाने आपली ही पवित्र जागा आपले आराध्य दैवत आणि वस्त्र निर्माता भगवान श्री जिव्हेश्वर यांच्या मंदिरासाठी दान देण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला. त्यांच्या या त्यागामुळेच रामदास मठाचे रूपांतर भगवान श्री जिव्हेश्वर मंदिरामध्ये झाले.
ग्रंथाचे वाचन आणि चिंतन चालू असतानाच, समाजातील काही निष्ठावंत व्यक्तींनी एकत्र येऊन मंदिर उभारणीसाठी एका कार्यकारिणीची स्थापना केली. यामध्ये श्री कृष्णराव दावलाजी धमाले, श्री विठ्ठल रामचंद्र पाटणकर, पांडोबा गोतमारे आणि इतर मान्यवरांचा समावेश होता. वर्ष १९४९-१९५० च्या दरम्यान एका छोट्या ओट्यावर भगवान जिव्हेश्वराच्या नावाने दिवाबत्ती सुरू झाली.
ऐतिहासिक नाटकांचे योगदान
१३ ऑगस्ट १९५० रोजी मंदिर उभारणीसाठी लोकवर्गणी व निधी गोळा करण्याच्या उद्देशाने समाज बांधवांनी एकत्र येऊन नाटकांचे प्रयोग करण्याचे ठरवले. साळी समाजातील हौशी व प्रतिभावान कलाकारांनी स्वतः 'उमाजी नाईक', 'मृच्छकटिक', 'शारदा' आणि 'मानापमान' यांसारखी अजरामर नाटके सादर केली. या नाटकांच्या तिकिटांतून गोळा झालेला निधी मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आला .
या ऐतिहासिक प्रयत्नांनंतर, ११ जुलै १९५५ रोजी पिठाधीश्वर परम पूज्य श्री गोविंदनाथ महाराज यांच्या हस्ते मंदिरात भगवान श्री जिव्हेश्वराच्या सुंदर संगमवरी मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि अधिकृत उत्सवांना सुरुवात झाली .
अखिल भारतीय स्तरावर मान्यता लाभलेली अधिकृत आरती
या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भारतवर्षात गायली जाणारी भगवान श्री जिव्हेश्वराची अधिकृत आरती याच अंजनगाव सुर्जी भूमीत रचली गेली आहे. मंदिराचे मूळ संस्थापक सदस्य स्व. श्री विठ्ठलराव रामचंद्र पाटणकर यांनी साधारणतः १९४० च्या सुमारास ही सुंदर, गेयता असणारी आरती रचली होती . ती सर्वप्रथम अंजनगाव सुर्जी येथील 'शालिनी प्रिंटिंग प्रेस'मध्ये छापून प्रसिद्ध करण्यात आली होती, ज्याची मूळ रंगीत छायाप्रत आजही मंदिरात संग्रहित आहे. २ ऑगस्ट २०१५ रोजी औरंगाबाद येथील सर्वसाधारण सभेमध्ये अखिल भारतीय स्वकुळ साळी समाजाच्या कार्यकारी समितीने या आरतीला संपूर्ण भारतवर्षासाठी 'एकच अधिकृत आरती' म्हणून मान्यता दिली.
मंदिराची वास्तू आणि रचना
मंदिराचा गाभारा ५ फूट मागे घेण्यात आला असून, सद्यस्थितीत (१ जानेवारी २०२४ पासून) मंदिराचे नूतनीकरण व जिर्णोद्धाराचे भव्य बांधकाम सुरू आहे.
| एकूण सभोवतालची जागा | ४३४.७० चौरस मीटर |
|---|---|
| मुख्य गाभारा | ८ x ८ फूट (संगमवरी दगडाची भगवान जिव्हेश्वराची उभी मूर्ती, सोबतीला हनुमानजी व शिवलिंग) |
| मंदिर सभामंडप | ३० x ५० फूट (दोन मजली भव्य सभागृह) |
| लहान कार्य जागा | ११० x ६० फूट (समाज बांधवांसाठी सवलतीच्या दरात) |
विद्यमान कार्यकारणी मंडळ
| अध्यक्ष | श्री मनोहर असलामोल |
|---|---|
| उपाध्यक्ष | श्री दिवाकर मेन |
| सचिव | श्री रवींद्र खरड |
| कोषाध्यक्ष | श्री संजय घाटे |
| कार्याध्यक्ष | श्री गुणवंतराव बाळापुरे |
| विश्वस्त व सदस्य | श्री गोपाळ ठणगण, श्री दिलीप तवले, श्री अशोक वाशीमकर, प्रा. राजेंद्र कहाणे, श्री रवींद्र बुरांडे, ऍड. प्रदीप ब. कीचंबरे, सौ. शुभांगी मनीष पाटणकर |
वर्षभर साजरे होणारे सण, उत्सव आणि सामाजिक उपक्रम
- भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव: दरवर्षी भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त भव्य पालखी दिंडी, शोभायात्रा आणि मिरवणूक काढली जाते.
- शैक्षणिक व जेष्ठ नागरिक सत्कार: समाजातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ समाज बांधवांचा संस्थानतर्फे विशेष सत्कार केला जातो.
- धार्मिक उपक्रम: कार्तिक महिन्यात काकड आरती, हनुमान जयंती, श्रावण महिन्यात अखंड ग्रंथ वाचन, कृष्ण जन्माष्टमी आणि दर सोमवारी सायंकाळी सामूहिक जिव्हेश्वर प्रार्थना व आरतीचे आयोजन केले जाते .
- संस्थान रुग्णवाहिका सेवा: सामाजिक बांधीलकी म्हणून संस्थानच्या वतीने गरजू रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा योजना चालवली जाते.
- रक्तदान शिबिर व जीवनरक्षक तक्ता: २०१८ मध्ये जिव्हेश्वर युवा मंडळाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून १०० रक्तदात्यांचा एक विशेष तक्ता तयार केला . आपत्कालीन परिस्थितीत या तक्त्यामुळे आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचे प्राण वाचले आहेत .
परिसरातील प्रमुख धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे
| प्रेक्षणीय / धार्मिक स्थळ | मंदिरापासूनचे अंतर |
|---|---|
| देवनाथ मठ (८०० वर्षांची पुरातन परंपरा) | ४ किलोमीटर |
| श्री क्षेत्र मुऱ्हादेवी (एकविरा मातेचे पुरातन मंदिर) | १० किलोमीटर |
| श्री गणपती मंदिर, बोराळा | ३ किलोमीटर |
| श्रीक्षेत्र गुलाब बाबा मठ व मंदिर, टाकरखेडा | ३ किलोमीटर |
| शहानूर धरण प्रकल्प (कोथरूड अचलपूर रोड) | १२ किलोमीटर |
| चिखलदरा (थंड हवेचे ठिकाण) / कोलकास अभयारण्य | ७० ते ८० किलोमीटर |